श्रीलंका .भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागरात वसलेला हा बेटांचा देश. पाचूंची बेटे. सध्या श्रीलंकेत जे काही वातावरण तयार झाले आहे ते पाहता ही पाचूंची बेटे की असंतोषाचे असंख्य ज्वालामुखी असा प्रश्न पडतो. श्रीलंका जवळपास दिवाळखोरीत निघाली आहे. परिस्थिती इतकी चिघळली आहे ची तब्बल साडेबारा बिलियन डॉलरच्या कर्जाच्या खाईत हा छोटासा देश लोटला गेला. भरीस भर म्हणून नैसर्गिक आपत्ती ,हवामान बदल अशा प्रश्नांच्या जाळ्यात श्रीलंका गुरफटला.
The Pearl of Indian Ocean- Srilanka (Source- unique times magazine) |
श्रीलंकेला कर्जपुरवठा करण्यात आघाडीवर आहेत चीन, जपान आणि अशियाई विकास बँक. यातील एकट्या चीनने 5 बिलियन डॉलर पेक्षा जास्त पतपुरवठा श्रीलंकेला केला.ही रक्कम रस्ते, बंदरे, विमानतळ बांधण्यासाठी होती. पण यांचे कंत्राटदार चीनी. कर्जफेड करता करता नाकी नऊ आले म्हणून हंबानटोटा बंदर चीनला द्यावे लागले.
कर्जबाजारी होत असलेल्या श्रीलंकेस पर्यटन व्यवसायावर थोडीफार आशा होती. कोरोनाने तीही मारून टाकली. त्यात पर्यावरणात होत जाणारे बदल असतील, अस्थिर झालेला मान्सूनचा पाऊस, समुद्राची वाढत चाललेली पातळी या सगळ्यांनी श्रीलंकेला गेल्या काही वर्षात अक्षरशः तडाखे दिले .रासायनिक खतांनी नायट्रोजन ऑक्साईड वाढतो म्हणून त्यावर बंदी घालण्यात आली. शेतकऱ्यांनी या निर्णयाविरोधात आंदोलनं सुरू केली तेव्हा ती धोरण मागे घेतले.
या धोरण धरसोडपणास कारणीभूत श्रीलंकेतील सत्ताधारी राजपक्षे कुटुंबीय.राष्ट्रपती गोटाबायांपासून पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्यासह नऊ राजपक्षे श्रीलंकेच्या सरकारमध्ये होते. भ्रष्टाचाराचे लागलेले आरोप, मनमानी कारभार यामुळे जनता आधीच यांच्यावर नाराज. वाढत जाणारा वर्णद्वेष , सामाजिक ध्रुवीकरण सर्व काही एकाच वेळी घडत होतं. इतक्या गंभीर परिस्थितीत आणीबाणी जाहीर झाली आणि बाहेर आला तो जनाक्रोश.
Source- India.com |
बौद्ध भिक्खूंपासून सामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येक जण राजपक्षें विरोधात आंदोलन करतोय. कोणाच्या घरी रॉकेल नाहीये. कोणाकडे पेट्रोल नाहीये. अन्न मिळवण्यासाठी श्रीलंकेत रांगाच्या रांगा लागतात.यातून बाहेर पडताना श्रीलंकेला भारत आठवला. चीन यांना कर्जाशिवाय मदत करेल असं काही वाटत नाही. भारताने आतापर्यंत डिझेल, पेट्रोल ,तांदूळ आणि कित्येक कोटी रुपये मदत म्हणून पाठवले आहेत .
एकाच वेळी पाकिस्तान आणि श्रीलंकेत आर्थिक आणि राजकीय संकट येणं हा दक्षिण आशियाच्या राजकारणाचा पुढचा अंक. चीन आणि भारत यांच्यातील दक्षिण आशियातील स्पर्धा शिगेला पोहोचण्याचा हा काळ. श्रीलंकेतील संकटाचे ढग कोण कसे दूर करतो यावर दक्षिण आशियाच्या भविष्याची नांदी ठरेल.