चार म्हातारी माणसं, दोन बापे आणि दोन बाया म्हणजे दोन पुरुष व दोन महिला बसमध्ये आले. त्यांचे थकलेले आणि केविलवाणे चेहरेच त्यांच्याविषयी बरंच काही सांगून जात होते. त्यातले दोघे नवरा बायको होते. सत्तरीच्या घरात असावेत. त्यातला माणूस जागा शोधत शोधत मागे गेला. दोन सीटा मिळाल्या की तो समाधानी झाला. बायकोला आज्ञा झाली, "बस तिथं. " दुसरा इसम हा पण सत्तरीत असावा. त्याच नाव असावं तात्या. त्याच्या वारकरी टोपीत अँड आणि सदऱ्यातून येणार घाम पुसत तो मागच्या सीटवर जाऊन बसला. त्याच्या शेजारच्या सीटवर ती चौथी आज्जी बसली.
तिचं नाव रखमाबाई. ती पण सत्तरीत असावी. शेलक्या पद्धतीने नऊवारी नेसून ती सीट शोधत होती मोठ्या आत्मविश्वासाने. तिची नऊवारी मुंबई पुण्यातल्यासारखी लग्नात मिरवणारी नव्हती. शेतात काबाडकष्ट करणारी नऊवारी तिला मोठा अभिमान देऊन जात होती.
तरंगेवाडीच्या प्रवाशांची तिकिटे कंडक्टर काढत होता. त्या वृद्ध जोडप्यापासून त्यानं सुरुवात केली. "कुठं जायचंय, मामा?" आपलं आधार कार्ड दाखवत, टोपी सांभाळत मामा म्हणाले,"नातेपुते, दोन. " तिकीट घेतलं, पैसे मात्र दिले नाहीत. महाराष्ट्र सरकार ७५ वर्षांवरील नागरिकांना एस.टी. ने मोफत प्रवास करायची सुविधा देतं. कंडक्टर पुढे सरकला. आता नंबर होता तात्यांचा. कंडक्टर ने परत तोच प्रश्न केला, "कुठे जायचं?" तात्या म्हणाले, "बरड, मी पण पंच्याहत्तर ओलांडल्यात." आपले एस. टी .चं कार्ड दाखवत तात्या गरजले. बरड म्हणजे फलटण पंढरपूर रोडवरच छोटंसं गाव.
कंडक्टरने आधार कार्ड मागितलं . तात्या वैतागून म्हणाले, "एक कार्ड दिलंय नव्ह, अजून दुसरं कशाला?" कंडक्टर नम्रपणे म्हणाला ," अहो, तुम्हाला मोफत तिकीट द्यायचं तर मशीन आधार नंबर मागतंय नाहीतर अर्धं तिकीट घ्यावं लागंल तुम्हाला." ऐकतायत ते तात्या कुठले. कंडक्टर आणि तात्यात बाचाबाची सुरु झाली.
तेवढ्यात रखमाबाई आपल्या सीटवरून उठली. नऊवारी सावरत तात्यावर ओरडली, "आरं, साहेबाची नोकरी जाईल तुला असच फुकट बसवलं तर, कळायला नको का तू पंच्याहत्तरच्या वर हाय ते? लगा, पंचवीस रुपयाचं तिकीट काढायला किती त्रास देतोय, ते म्हणतायत नव्ह पुढल्या खेपेला घरी येतो सोडायला..!" कंडक्टर बावचळला. रखमाबाईला म्हणाला, "तुम्ही खाली बसा, कशाला मध्ये पडताय भांडणाच्या?"
सगळी बस रखमाबाईकडं बघत होती. रखमाबाईने पुढे बोलायला चालू केलं. तिच्या हातात आधार कार्ड तर होतच पण सोबत मतदान ओळखपत्र, एस.टी. कार्ड पण होता. तात्या तिच्या निशाण्यावरच होता अजून. "आर, मी बाई असून माझ्याकडं तीन कार्ड हाईत, तुला एक कार्ड आणायला कंटाळा येतुय का ?"
बावचळलेला कंडक्टर हसायला लागला. रखमाबाईला परत एकदा बस म्हणाला. तात्याकडे आता पर्याय नव्हता. तेवढ्यात मामाने पण आपला आधार कार्ड पुढे केला. आपल्या दक्खनी उर्दूत तात्याला बोलला, "इसको आधार कारड बोलते है, ये घेऊन आने का होता है , तभीच फुकट तिकीट मिळता है! आजकाल ये लोगोंको लहानपणीच मिळता है. " तात्याने आपल्या सदऱ्यातून २५ रुपये काढले आणि टेकवले कंडक्टर च्या हातावर. कंडक्टर अजून पण तात्याला समजावत होता, " मला कुठं वाटतंय तुम्ही तिकीट काढावं? मी आपला जी. आर. आलाय तो सांगतोय तुम्हाला. पुढच्या वेळेस घेऊन या आधार कार्ड. "
तात्या आता शांत बसला. शेवटी पंचवीस रुपयाचा फटका बसला त्याला. रखमाबाई खिडकीच्या बाहेर बघत होती. कंडक्टर आपल्या सीटवर निघून गेला. मामाने खिशातून चुना काढला. सगळे आपल्याआपल्या जगात निघून गेले, त्या छोट्याश्या आधार कार्ड नावाच्या कागदाला विसरून.
लेखक
चैतन्य
मस्त लिहिलंयस👌
ReplyDeleteKhup chhan lihile ahe 👍
ReplyDeleteशासनाच्या योजनांचा स्थानिक पातळीवर लाभ होत असताना त्याच्यामध्ये राहून जाणाऱ्या त्रुटी या प्रसंगाद्वारे खूप छान शब्दांत मांडल्या आहेस.👌👍
ReplyDelete